धानोरा : दोन पिकअप वाहनांमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या गाई-बैलांना धानोरा पोलिसांनी जीवदान दिले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने गोडलवाही फाटा ते धानोरा मार्गावर सापळा रचुन ही कारवाई केली.
दोन पिकअप वाहने संशयितरित्या येताना दिसल्यानंतर मार्गावर तात्पुरता अडथळा निर्माण करुन दोन्ही वाहनांना थांबवण्यात आले. त्या वाहनांची तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे निर्दयीपणे कोंबुन भरलेली असल्याचे निदर्शनास आले. वाहन क्रमांक एमएच 34 बी.जी. 5152 चा चालक प्रतिक डंबाजी बांबोळे, रा.उसेगाव ता.सावली जि.चंद्रपूर यांच्या वाहनातून 2 बैल आणि 5 गायी, तर वाहन क्रमांक एमएच 34 बी.झेड. 4904 चा चालक भुवन नामदेव सोनुले, रा.सावली ता.सावली जि.चंद्रपूर याच्या ताब्यातील वाहनातून 4 बैल व 3 गायी अशा एकुण 14 जनावरांची सुटका करण्यात आली. याशिवाय त्यांचा सहकारी गोलु फाले रा.पारडी ता.सावली जि.चंद्रपूर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला..
एकूण 8 लाखांची वाहने आणि 1.15 लाखांची जनावरे असा 9,15,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी (पेंढरी, कॅम्प कारवाफा) जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोराचे प्रभारी अधिकारी स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक चैत्राली भिसे, उपनिरीक्षक सुमित चेवले, एएसआय टेंभुर्णे, हवालदार गावडे, रविंद्र मडावी, नायक बोरकुटे, मानकर, शिपाई चंद्रशेखर मैंद, शशिकांत मडावी यांनी केली.