आरमोरी : येथील इंदिरानगर, डोंगरी या नगर परिषदेच्या वाढीव क्षेत्राच्या गावठाणाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्या जागेच्या भूमापनासाठी उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून नगर परिषदेकडे पैसे भरण्यासाठी पत्र देण्यात आले. पण आरमोरी नगर परिषदेकडून ते पैसे भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याने गोरगरीब नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरून नगर प्रशासनाविरोधात मोर्चा काढला.
आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात काढलेल्या या मोर्चाने नगर प्रशासनाला हादरवले. अखेर पाच दिवसात गावठाणाच्या भूमापनाचे पैसे भूमी अभिलेख कार्यालयाकडे भरण्याचे आश्वासन मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी मोर्चेकरांना दिले. त्यामुळे प्रस्तावित चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.
गावठाणाच्या मोजणीचे पैसे नगर परिषदेने लवकरात लवकर भरावे आणि नागरिकांना लवकरात लवकर पट्टे मिळावे यासाठी नागरिक नगर परिषदेकडे चकरा मारत होते. पण प्रशासक तथा मुख्याधिकारी दाद देत नसल्यामुळे आदिवासी काँग्रेसने नगर प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. अखेर मंगळवारी नागरिकांनी छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
सकाळी 11 वाजता निषेध मोर्चा काढुन 12 वाजता आरमोरी येथील मुख्य मार्गावरील बसस्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. मात्र तत्वूर्वीच मुख्याधिकाऱ्यांनी मोर्चेकरांना सामोरे जाऊन पैसे भरण्याचे आश्वासन दिल्याने चक्काजाम स्थगित करण्यात आल्याचे छगन शेडमाके यांनी सांगितले.