गडचिरोली : संविधान जागर समिती महाराष्ट्र द्वारा आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर यात्रेचे आयोजन केले होते. गडचिरोली शहरात रॅली काढून सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबोधित करताना माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जनजाती मोर्चा) अशोक नेते यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. गेल्या 10 वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाच्या आधारेच देशाचा कारभार चालवत आहे. त्यांनी भारताचे संविधान आणि त्याचे निर्माते डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच सन्मान केला. पण विरोधकांनी लोकांची दिशाभूल केल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी खा.नेते म्हणाले, देशामध्ये २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. गेल्या 10 वर्षात मोदींनी प्रगतीशिल, विकसित भारत घडविण्यासाठी अनेक योजना आणल्या. दीन-दलित, शोषित, वंचितांपर्यंत त्या योजनाही पोहोचवण्यात आल्या. देशाला विकासाची दृष्टी देण्यासोबत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखविली. परंतू विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करत संविधान बदलविणार असल्याचा अपप्रचार केला. वास्तविक पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी संसदेची पायरी ओलाडताना मोदी नतमस्तक झाले होते. जर बाबासाहेबांनी संविधान लिहिले नसते तर पंतप्रधान म्हणून मी सुद्धा या खुर्चीवर बसलो नसतो, ही संविधानाची ताकत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न देताना बाबासाहेबांना भारतरत्न देण्यापासून वंचित ठेवले. पण हे काम भाजप सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. काँग्रेसच्या लोकांनी एक नाही तर दोनदा बाबासाहेबांचा पराभव करून त्यांना संसदेत जाण्यापासून रोखण्याचे महापाप केल्याचा घणाघात अशोक नेते यांनी करत संविधान जागर यात्रेचा समारोप केला.
यावेळी मंचावर आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.वाल्मिक (तात्या)निकाळजे, सामाजिक संघटनेचे नेते राजेंद्र गायकवाड, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, अनु.जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड.उमेश वालदे, डॉ.चंदा कोडवते, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, केशव निंबोड, जनार्धन साखरे, प्रा.अरुण उराडे, योजना ठोकले, स्नेहा भालेराव, आकाश अंभोरे, विजय गव्हाळे, नागसेन पुंडके, देवाजी लाटकर, वर्षा शेडमाके, दीपक जाधव, ज्ञानेश्वर बावणे, नामदेव काटवले, लता लाटकर यांच्यासह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
ढोलताशांच्या गजरात निघाली रॅली
संविधान जागर यात्रा रॅली ही ढोलताशांच्या गजरात आणि आतिषबाजी करत शहरातून काढण्यात आली. भारतीय संविधानाचा विजय असो, भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचा विजय असो, असा जयघोष करत ही रॅली शासकीय विश्रामगृह (कॉम्प्लेक्स) पासून ते गडचिरोली शहरातील आठवडी बाजार, हनुमान मंदिर, तेली मोहल्ला, सराफा लाईन, तळघर, वंजारी मोहल्ला, गुजरी वार्ड, सर्वोदय वार्ड, फुले वार्ड येथे पोहोचून संत रोहिदास महाराज समाज मंदिर सभागृहामध्ये संविधान जागर यात्रेची समारोपीय सभा झाली. फुले वॅार्डातील बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प आणि माल्यार्पण करत पुजन करण्यात आले.