अहेरी : येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या खिडकीवर विषारी मांजऱ्या साप चढल्याने शुक्रवारी सर्वांची एकच धांदल उडाली. कर्मचारी व पक्षकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम.एच. शाहिद यांनी तत्काळ त्या खिडकीपासून दूर राहण्याचे आवाहन करत सर्पमित्राला पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र श्रीनिवास दंडीकेवार आणि त्यांचे सहकारी आदित्य पुसालवार यांनी त्या विषारी सापाला पकडण्यात यश मिळवले. सापाला पकडल्यानंतर त्याला जंगलात सोडून दिल्याने अधिवक्ता, कर्मचारी व पक्षकारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
काही साप विषारी असतात तर काही बिनविषारी असतात, मात्र सापांपासून नागरिकांनी दूरच राहिले पाहिजे, असे आवाहन सर्पमित्र आदित्य पुसालवार यांनी केले. मांजऱ्या हा साप विषारी असून त्याला कोणी छेडण्याचा प्रयत्न केला तरच तो पलटवार करतो, अन्यथा कोणाला काही करत नाही. हा साप हवेत उडूनही हल्ला करतो. त्यामुळे अशा विषारी सापांपासून सावध असणे आवश्यक आहे, अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.