बालक मृत्यूप्रकरणी जिल्हास्तरीय चौकशी समितीची आरोग्य विभागाला क्लिनचिट

आता लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे

गावात जाऊन माहिती घेताना आरोग्य विभागाचे प्रतिनिधी

गडचिरोली : जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी आणि त्यांचे मृतदेह नेण्यासाठी शववाहिका न मिळाल्याबाबतच्या वृत्तावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे. या प्रकरणात जिमलगट्टा आरोग्य केंद्राला क्लिनचिट दिली आहे. मुलांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप यायचा आहे, तो आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान कोणीही आरोग्याच्या तक्रारीसाठी अंधश्रद्धेतून इतर उपाय करण्याऐवजी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन जि.प.च्या सीईओ आयुषी सिंह यांनी केले आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दक्षिण गडचिरोलीच्या दुर्गम भागात जनजागृती केली जाणार असल्याचे अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा अंतर्गत येर्रागड्डा गावातील वेलादी दाम्पत्याच्या दोन मुलांना 4 सप्टेंबरला सायंकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यान त्यांच्या पालकांनी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.दुर्गा जराते यांनी तपासणी केली. परंतू दवाखान्यात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला असल्याचे दिसुन आले. घटनेच्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा येथे डॉ.दुर्गा जराते यांच्यासह आरोग्य सहायिका सुलोचना चिलमकर, परिचर सुभाष आत्राम, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी स्नेहल चौधरी, कंत्राटी वाहन चालक आशिष पस्पुनुरवा, डाटा एन्ट्री आॅपरेटर शंकर पेरगु उपस्थित होते. मृत बालकांना नेण्याकरीता रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालकांना सांगितले. परंतु शवविच्छेदनासाठी घेऊन जाणार अशी शंका आल्याने त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता स्वतः मृतदेह स्वगावी येर्रागड्डा येथे घेऊन गेले. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा यांनी तात्काळ पोलीस स्टेशन जिमलगट्टा येथे सदर घटनेबाबत लेखी स्वरुपात कळविले.

पोलिसांनी 5 सप्टेंबरला सकाळी 6 वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या रुग्णवाहिकेने येर्रागड्डा येथे जावुन पालकांची समजूत काढली. त्यानंतर बालकांचे शव तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे आणले व शवविच्छेदन आटोपुन त्याच रुग्णवाहिकेने त्यांना त्यांच्या गावी येर्रागड्डा येथे सोडण्यात आले.

नेमका मृत्यू कशामुळे?

दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियमित गृहभेटीदरम्यान रमेश वेलादी यांच्या घरी भेट दिली असता आई व्यतिरिक्त कुणालाही आरोग्याबाबत तक्रार नव्हती. त्यांचे रक्तनमुने सुद्धा हिवतापाकरिता तपासले, पण ते दुषित आढळून आलेले नाही. त्यानंतर 4 सप्टेंबरला आरोग्य सेवक आर.एम.मडावी यांच्या गृहभेटीदरम्यान सदर कुटुंब घरी उपस्थित नव्हते. यादरम्यान सदर
कुटुंबातील कुणीही शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला नाही. या संपूर्ण प्रकरणात शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

अंधश्रद्धेतून इतर उपाय करणे टाळा

ज्या नागरिकांना किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना अचानक ताप येणे किंवा इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्यांनी वेळ न दडवता व अंधश्रद्धेतून इतर उपाययोजना न करता तातडीने सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय किंवा नजीकच्या रुग्णालयात आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.