जिल्ह्यातील बेरोजगारांची भटकंती थांबेल, जनसन्मान यात्रेत अजितदादांचा विश्वास

रियाझ शेख यांचा सेनेला 'जय महाराष्ट्र'

आलापल्ली : गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करत आहे. पण रोजगार दिल्याशिवाय आर्थिक सुबत्ता येत नाही. कोनसरीतील लोहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 3200 स्थानिक युवकांना आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या 800 इतर भागातील कर्मचाऱ्यांना रोजगार दिला. पुढील टप्प्यात आणखी मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढणार आहे. याशिवाय वडलापेठच्या सुरजागड इस्पात प्रकल्पातूनही जवळपास 10 हजार युवकांना रोजगार मिळेल, असे सांगत भविष्यात येथील बेरोजगारांना रोजगारासाठी इतरत्र भटकंती करावी लागणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (6 सप्टेंबर) ‘जनसन्मान यात्रा’ काढण्यात आली. त्यानंतर क्रीडा संकुलाच्या मैदानात त्यांनी भरगच्च सभेला मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि.प. उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, राकाँचे ज्येष्ठ नेते बबलू हकीम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नाना नाकाडे, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, हर्षवर्धनबाबा आत्राम, रामेश्वरबाबा आत्राम, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर विश्वास, सरपंच शंकर मेश्राम, अहेरी विधानसभेचे अध्यक्ष लक्ष्मण येरावार, युनूस शेख, सारिका गडपल्लीवार, पुष्पा अलोने, रमेश मारगोनवार, सतीश भोगे, मधुकर कोलुरी, सुरेंद्र अलोने, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील आदिवासी समाज निसर्गाशी नातं कायम ठेवून आहे. निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या या समाजाने निसर्गाचा समतोल राखण्याचे काम केले आहे. राज्यातील माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा यासाठी मी अर्थसंकल्प सादर करत असताना तब्बल 15 हजार 360 कोटींची तरतूद केली. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास होऊच शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

गडचिरोली जिल्ह्यात लवकरच मेडिकल कॉलेज उभारले जाणार आहे. त्याची मंजुरी राज्य सरकारने दिली आहे. याशिवाय त्यासाठीची आर्थिक तरतूद देखील करून ठेवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. याबरोबरच आरोग्यविषयक समस्या सोडवण्यास मदत मिळणार आहे. आम्ही आरोग्याची सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याकरिता 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा प्रत्येक कुटुंबाला दिला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ मोठ्या प्रमाणावर राज्यभरातील माझ्या मायमाऊली भगिनींना होत आहे. मुलींना मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता, तीन गॅस सिलिंडर मोफत यासारख्या सवलती आम्ही देऊ केल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज बिले आम्ही माफ केली आहे. मौलाना आझाद विकास महामंडळाची मर्यादा 60 कोटींची होती ती हजार कोटींची केली. यासारख्या प्रभावी योजना अनेक वर्षे सुरू राहाव्यात यासाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

प्राणहिता पोलीस मुख्यालयापासून नागेपल्ली येथील रेड्डी कॉम्प्लेक्सपर्यंत बाईक रॅलीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नागेपल्ली येथे लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांना राख्या बांधल्या. यावेळी अजित पवार यांनी बहिणींची संवाद साधला. त्यानंतर वि.दा.सावरकर चौकातून आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने रेला नृत्य करत मान्यवरांना कार्यक्रमस्थळी आणले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख (अहेरी क्षेत्र) रियाज शेख यांनी आपल्या पक्षातील विविध तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी, नगरसेवक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला. यावेळी अजित पवार व मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत पुष्पगुच्छ देऊन सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.