गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 192 बटालियनचा 18 वा स्थापना दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या स्पर्धांनी साजरा झाला. कमांडंट परविंदर सिंग आणि द्वितीय कमांडिंग ऑफिसर नरेंद्र कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वप्रथम छावणीतील हुतात्मा स्मारक येथे बटालियनच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. 192 बटालियनच्या शहीद जवानांच्या बलिदानाची आणि बटालियनची स्थापना आणि तैनातीबद्दल उपस्थित जवानांना माहिती देण्यात आली.
192 बटालियनची स्थापना 12/09/2007 रोजी ग्रुप सेंटर-II, सीआरपीएफ, अजमेर येथे करण्यात आली. ही बटालियन दहशतवादाशी लढण्यासाठी जम्मू-काश्मिरमध्ये तैनात करण्यात आली. त्यानंतर 15/08/2009 रोजी नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली येथे ही बटालियन तैनात करण्यात आली.
गेल्या 17 वर्षात या बटालियनने गडचिरोलीतील नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईत सक्रीय सहभाग घेतला असून अगणित यश संपादन केले आहे. या बटालियनला आतापर्यंत एकूण 1873 पदके मिळाली आहेत. त्यात शौर्यपूर्ण कामगिरीसाठी 2 राष्ट्रपती पोलीस पदक, गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक, अतिउत्कृष्ट सेवा पदक, उत्कृष्ट सेवा पदक, तसेच आंतरिक सुरक्षा सेवा पदके 1753 आदींचा समावेश आहे.