गडचिरोली जिल्ह्यात लवकरच धावणार 50 इलेक्ट्रीक बसगाड्या, लालपरीही नवीन

सद्यस्थितीत 70 गाड्यांची कमतरता

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कधी उखडलेले छत तर कधी वायपर हाताने हलवाव्या लागणाऱ्या बसगाड्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दुरवस्था झालेल्या बसगाड्यांचा अनेक वेळा प्रवाशांनाही त्रास होतो. पण हा त्रास आता दूर होणार आहे. कारण गडचिरोलीच्या एसटी विभागीय कार्यालयाला प्रथमच 50 इलेक्ट्रीक बसगाड्या मिळणार आहेत. याशिवाय काही नवीन लालपरी गाड्याही दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बसगाड्यांची कमतरता दूर होणार आहे.

गडचिरोली विभागांतील गडचिरोली, अहेरी आणि ब्रह्मपुरी या तीन आगारांमिळून पूर्वी 250 बसगाड्या होत्या. पण अनेक बसगाड्या खटारा झाल्यामुळे त्या भंगारात काढण्यात आल्या. आताच्या स्थितीत 180 गाड्यांवरच काम भागविले जात आहे. विभागाला जवळपास 70 गाड्यांची कमतरता आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात राज्यभरासाठी 5150 इलेक्ट्रीक गाड्या येणार आहेत. त्यापैकी 50 गाड्या गडचिरोलीत दिल्या जाणार आहेत. याशिवाय महामंडळाला राज्यभरात 2400 नवीन लालपरी गाड्या येणार आहेत. त्यापैकी काही गाड्या गडचिरोलीला दिल्या जाणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांनी दिली.