गडचिरोली : देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू येत्या 5 जुलैला गडचिरोलीत येणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास त्यांच्या हस्ते होणार असून विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच देशाच्या राष्ट्रपतींचे गडचिरोलीत आगमन होणार आहे.
खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी गेल्या भाजपा अनु.जनजाती मोर्चा यांनी 10 मे रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना दिले होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रपतींनी गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भागातील कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण स्वीकारले होते. त्यानुसार त्यांचा हा गडचिरोली दौरा निश्चित करण्यात आल्याची माहिती खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, आकांक्षित, नक्षलग्रस्त जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रपतींचे आगमन होणे ही गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक घटना ठरणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले आहे.