डीजे आणि ढोलताशाच्या तालावर नाचत गणरायाला निरोप, उशिरापर्यंत मिरवणुका

सायलेन्स झोनचा सर्वांनाच पडला विसर

गडचिरोली : गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेश उत्सवाची मंगळवारी अनंत चतुर्दशीला सांगता झाली. सर्वांचे आकर्षण असणाऱ्या मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांना संध्याकाळी सुरूवात झाली. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. गडचिरोलीकरांनी मिरवणुका पाहण्यासाठी इंदिरा गांधी चौकात एकच गर्दी केली होती. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान शहरातील रुग्णालय परिसरासारख्या सायलेन्स झोनमध्येही मोठ्या आवाजात डीजे वाजत असल्याने सायलेन्स झोनच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात यावर्षी 469 सार्वजनिक आणि दोन हजारांवर घरगुती गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. शहरातील इंदिरा गांधी चौकातल्या विश्रामगृहात विराजमान गणेश मंडळाच्या गणपतीला विसर्जन मिरवणुकीसाठी संध्याकाळी सजवलेल्या वाहनावर विराजमान करण्यात आले, पण जवळपास अडीच तास मिरवणूक विश्राम भवनाच्या आवारातच होती. त्या ठिकाणी शिवशंकराच्या वेशभुषेतील कलावंताचे डीजेच्या तालावर तांडव नृत्य आकर्षणाचे केंद्र झाले होते. त्याच्यासोबत मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही बेभान होऊन नृत्य केले. यासोबत आदिवासी पथकानेही पारंपरिक नृत्य सादर केले.

रात्री 10 वाजताच्या नंतर विसर्जन मिरवणुका एकामागून एक इंदिरा गांधी चौकात दाखल झाल्या. यावेळी दोन हजारावर नागरिक चौकात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी जमले होते. गोकुळनगरच्या तलावात मोठ्या मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अपघात टाळण्यासाठी तलावाच्या आत बांबुचे कठडेही लावण्यात आले होते. याशिवाय घरगुती गणपतींसाठी नगर परिषदेने विसर्जन कुंड ठेवले होते.

महिला व बाल रुग्णालयाचा विसर

शहराच्या इंदिरा गांधी चौकालगत असलेल्या महिला व बाल रुग्णालयापासून 100 मीटरपर्यंतचे अंतर हे सायलेन्स झोन आहे. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी हा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मोठ्या आवाजात वाद्य वाजविण्यास मनाई आहे. मात्र रुग्णालयाला लागूनच असलेल्या विश्रामगृहाच्या आवारात दोन तासांपेक्षा अधिक वेळ मोठ्या आवाजात डीजे वाजत होता. हा भाग सायलेन्स झोन असल्याचे भान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाच नाही तर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही राहिले नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मंगळवारी विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या आवाजाने हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू ओढवण्याच्या घटना राज्यात काही ठिकाणी घडल्या आहेत.