अहेरी : वनवैभव शिक्षण मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे आणि अनेकांसाठी रोजगारदाते ठरलेले अब्दुल रहीम अब्दुल हकीम उर्फ बब्बूजी हकीम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दि.18 रोजी दुपारी अहेरीतील कब्रस्तानात अंतिम संस्कार करण्यात आले. बब्बुजी हकमी यांच्या रूपाने मी एक अभ्यासू, जाणकार साथीदार गमावला असून त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे आहे, अशा शब्दात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
माझ्या राजकीय जीवनात समर्थपणे साथ देऊन माझ्या राजकीय जीवनाला कलाटणी देण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे. त्यांनी खडतर प्रवास करून ‘शुन्यातून विश्व’ निर्माण केले होते. वनवैभव शिक्षण मंडळाची स्थापना करून आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात व प्रामुख्याने अहेरी उपविभागात शिक्षणाचे जाळे पसरविले. आज असंख्य मुले-मुली शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यामुळेच त्यांना प्रतिष्ठेचा व मानाचा आदिवासी सेवक पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले.
त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्याकरिता अधून-मधून थेट त्यांच्या घरी, तर कधी खमनचेरू मार्गाने येणे-जाणे झाले की, नित्यनेमाने बब्बुजी हकीम यांच्या घरासमोर गाडीला ब्रेक लागायचे. त्यांच्याशी बोलूनच माझा पुढचा प्रवास होत असे. माझ्या वैयक्तिक, सामाजिक, राजकीय जीवनात व चढउतारात सदैव त्यांची साथ मला लाभली होती, अशीही भावना ना.धर्मरावबाबा यांनी व्यक्त केली.
बब्बुजी यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात फार आवड होती. हॉकी, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल या खेळांमध्ये ते तरबेज होते. वयोमानानुसार त्यांची प्रकृती ढासळली होती. अनेक वर्षांपासून ते अंथरुणावर होते. त्यातच जानेवारी महिन्यात त्यांची अर्धांगिनी चाचम्मा हकीम यांचे निधन झाल्याने ते आणखीच खिन्न झाले होते.