राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्या; खासदार डॉ.किरसान यांच्या सूचना

प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

गडचिरोली : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आरमोरी-गडचिरोली, आष्टी-आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती देण्याची आणि रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून तात्पुरत्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शासकीय विश्राम भवनात डॉ.किरसान यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (वेस्ट झोन ) मुख्य अभियंता मनोज कुमार, मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी प्रशांत फेगडे, मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता (नागपूर) न.व. बोरकर, कार्यकारी अभियंता एन.एस. बोबडे यांच्यासॊबत बैठक घेतली. यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील पुलांची उंची वाढविण्याचे आणि नवीन पूल तयार करताना शक्यतो जुना पूल कायम ठेवून बाजूला नवीन पूल उभारण्याच्या सूचना खासदारांनी केल्या. यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही. याव्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्गाच्या कामास पर्यावरणीय किंवा वनविभागाच्या परवानगीसंदर्भात किंवा इतर कुठल्याही अडचणी येत असल्यास त्या दूर करण्याकरिता पूर्ण सहकार्य करणार असल्याचे खा.डॅा.किरसान यांनी बैठकीत सांगितले.