गडचिरोली : मुंबईच्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेचा धसका घेत जिल्हा परिषदेने मोठ्या आकाराचे होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू केली आहे. यात शहरातील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनाच्या आवारात अधिकृत परवानगी घेऊन लावलेले होर्डिंगही उतरवण्यात आले. होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतरसुध्दा जि.प.प्रशासनाने हे होर्डिंग काढण्यासाठी आततायीपणा केला, असा आरोप होर्डिंगमालकांनी पत्रपरिषद घेऊन केला.
विशेष म्हणजे जि.प.च्या बांधकाम उपविभागामार्फत हे होर्डिंग उतरवण्यासाठी गॅस कटरचा वापर करताना घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करून चार होर्डिंग्ज बळजबरीने काढल्याचे होर्डिंग मालकांनी सांगितले. ही कारवाई करताना होर्डिंगचे लहान लहान तुकडे केल्याने प्रत्येकी होर्डिंगसाठी पाच लाखाप्रमाणे नुकसान झाल्याचा दावा होर्डिंग मालक कैलास शर्मा, डिलेश सुरकार, चेतन साखरकर यांनी केला.
ही कारवाई करण्यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे जमा केलेली अनामत रक्कमही परत केली नाही, शिवाय कारवाईची माहिती होर्डींग मालकांना लिखित स्वरूपात दिली नाही, असा आरोप करण्यात आला. सदर कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे होर्डिंग मालकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.