गडचिरोली : ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेनुसार दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने गडचिरोली पंचायत समितीत तालुकास्तरीय स्वच्छता रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते स्वच्छतारुपी मशालज्योत पेटवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
‘स्वच्छताही सेवा’ अंतर्गत गटविकास अधिकारी एस डी.गोंगले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही स्वच्छता रॅली पंचायत समिती गडचिरोली ते जिल्हा परिषद मुख्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी सीईओ आयुषी सिंह आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र कणसे यांच्या हस्ते स्वच्छतारुपी मशालज्योत पेटवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. या रॅलीमध्ये पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची चमू आदींनी सहभाग नोंदविला. यावेळी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रकल्प व्यवस्थापक अमित मानुसमारे यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली. स्वच्छता ही प्रत्यक्ष स्वभावात व स्वतःच्या संस्कारात रुजविण्याचे आवाहन यावेळी सीईओ आयुषी सिंह यांनी उपस्थितांना केले.
या रॅलीच्या आयोजनासाठी सहायक गटविकास अधिकारी प्रल्हाद पदा, सहायक प्रशासन अधिकारी अपर्णा पातकमवार, पशुधन विकास अधिकारी काळे, विस्तार अधिकारी (पंचायत) पाल, प्रदीप बारई, कुमुद शेबे इत्यादींनी सहकार्य केले.