देसाईगंज : देसाईगंज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. कोंढाळाची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.26) कोंढाळा येथील कंपनीच्या कार्यालयामध्ये झाली. आ.कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी होते.
या सभेत कंपनीच्या वार्षिक अहवाल पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे कंपनीच्या दिवंगत सभासदांच्या वारसांना शाल व साडी देऊन सभासदांनी दिलेल्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. तसेच एनसीटी कोढे मॉडल श्री पद्धतीनुसार उत्कृष्ट धान लागवड केल्याबद्दल सभासद विनोद ठेंगरे यांचाही सत्कार करण्यात आला.
कंपनीच्या कार्यक्षेत्राअंतर्गत 10 गावातील 500 शेअरधारक शेतकरी आहेत. त्यातील बहुतांश शेतकरी या सभेला उपस्थित होते. संचालन चैतनदास विधाते यांनी केले. जमाखर्च सीईओ कोणार्क बोनगिलवार यांनी वाचन करून दाखविला. आभार कंपनीचे संचालक मेघनाथ दुनेदार यांनी मानले.
या सभेला नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक पौनीकर, देसाईगंजचे तालुका कृषी अधिकारी खंडाळे, एनसीटी महेश, गडचिरोलीवरून आत्माचे नोडल अधिकारी कोचरे, माजी महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी, आत्माचे बीटीएम रहांगडाले, बँक आॅफ महाराष्ट्र देसाईगंज शाखेचे शाखा प्रबंधक, ग्रीन गोंडवाना कंपनीचे अध्यक्ष प्रशांत दर्वे, कंपनीचे सदस्य, संचालक व सभासद उपस्थित होते.