गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने गेल्या 10 वर्षात देशातील आदिवासी समाजाचा जेवढा सन्मान केला तेवढा इतर कोणत्याही सरकारने केला नाही. आदिवासींच्या सन्मानार्थ 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून जाहीर करण्यापासून तर राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च स्थानी एका आदिवासी महिलेला विराजमान करण्यापर्यंतचे काम या सरकारने केले. त्यामुळे आदिवासी समाज कायम भाजपसोबत राहील, असा विश्वास भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूरचे माजी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला.
नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात शुक्रवारी (दि.27) भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या विदर्भ विभागीय मेळाव्याला मा.खा.नेते मार्गदर्शन करीत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, संसदेच्या एससी-एसटी समितीचे अध्यक्ष खा.फग्गनसिंह कुलस्ते, अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उत्तम इंगळे, माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, प्रदेश संपर्क प्रमुख किशोर काळकर, मध्यप्रदेश युवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.निशांत खरे, संघटन मंत्री हितानंद शर्मा, गडचिरोलीचे आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, यवतमाळचे आ.संदीप धुर्वे, प्रदेश चिटणीस नितीन मडावी, महामंत्री सुदर्शन शिंदे आदी अनेक नेते उपस्थित होते.
अतिशय उत्साहात आणि भरगच्च उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात विदर्भातील आदिवासी संस्कृतीचा एकत्रित मिलाप पहायला मिळाला. गडचिरोलीसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील आदिवासी पथकांनी पारंपरिक वेशभूषेत आदिवासी नृत्य सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी मार्गदर्शन करताना मा.खा.अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला सुजलाम् सुफलाम् करण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले. देशातला प्रत्येक नागरिक, मग तो दीन, दलित, शोषित, पिडीत, वंचित असो, आदिवासी असो की अल्पसंख्यांक असो, प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न पाहात पंतप्रधान मोदींनी तशी वाटचाल सुरू केली आहे. आदिवासी समाजासाठी तर अनेक योजना अंमलात आणल्या. त्यांच्या कार्यकाळातच आदिवासी मंत्रालय, आदिवासी आयोग स्थापन झाला. 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून पाळण्यातही त्यांचाचा मोलाचा वाटा आहे. महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण दिले. विरोधकांनी महिलांच्या खात्यात महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट देऊ, असे खोटे सांगत संविधानावरून देशवासियांची दिशाभूल केली. पण लोक वारंवार विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणुन महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये देत आहे. यामुळे महिलांच्या कुटुंबाला मोठा आधार झाला असून त्यांचा आत्मसन्मान वाढला असल्याचे नेते म्हणाले.
या मेळाव्याचे संचालन भाजपचे गडचिरोली जिल्हा महामंत्री तथा अनु.जमाती मोर्चाचे चिटणीस प्रकाश गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन माजी महापौर मायाताई इवनाते यांनी केले. या मेळाव्याला माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, नागपूर शहर उपाध्यक्ष विवेक नागभिरे, अरविंद गेडाम, प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाचे सोशल मीडिया प्रमुख अक्षय उईके, तसेच मोठ्या संख्येने विदर्भातून आलेले आदिवासी बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.