आरमोरी : आरमोरी नगर परिषदेच्या हद्दीतील शक्तीनगरमधील मुख्य मार्गालगत पेविंग बॅाक्स लावण्याचे काम सुरू आहे. पण 9 मीटरचा रस्ता असताना नाली आणि पेविंग ब्लॅाक्ससाठी चक्क 4 मीटरची जागा सोडल्याने प्रत्यक्ष रस्त्यासाठी अवघी 5 मीटरची जागा शिल्लक राहिली आहे. तांत्रिकदृष्ट्या हे काम अयोग्य असून हे नियोजनशून्य काम तातडीने थांबवून त्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह आ.कृष्णा गजबे आणि इतर पक्षांच्या नेत्यांनाही निवेदन देण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, शक्तीनगरात गुंफावार यांच्या घरापासून तो अशोक सपाटे यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॅाक लावण्याचे काम सुरू आहे. त्या रस्त्याची रुंदी 9 मीटर असताना त्यात दोन्ही बाजुच्या नाली बांधकामात 1 मीटर जागा गेली आहे. याशिवाय पेवर ब्लॅाकसाठी 3 मीटर जागा घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रस्ता केवळ 5 मीटर रूंद राहिला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुने बांधलेल्या नाल्या रस्त्यापेक्षा उंच आहेत. याशिवाय नाली, नळाचे बांधकाम, स्ट्रीट लाईटचे पोल व त्याकरिता केलेली अंडरग्राऊंड केबल जोडणी यामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नाही.
हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात हे काम नगर परिषदेमार्फतच होत असल्याचे दिसून येते. या रस्त्यावरील वर्दळ पाहता रस्ता वाहतुकीसाठी अतिशय अरूंद ठरणारा आहे. त्यामुळे पूर्ण 9 मीटर रूंद रस्त्यावर सिमेंट काँक्रिटचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या रस्त्यालगत आधी असलेले नालीचे बांधकाम पक्के असताना ते तोडून नव्याने नालीचे बांधकाम करण्यात आले. ते नागरिकांच्या हितासाठी नाही तर अधिकारी आणि ठेकेदारांच्या आर्थिक हितासाठी करण्यात आल्याचे नागरिकांची म्हणणे आहे. पेवर ब्लॅाक लावण्यासाठी 15 ते 20 वृक्षही तोडण्यात आल्याचे सांगितले जाते.
नियोजनशून्य बांधकाम करून नागरिकांच्या आणि शासनाच्या पैशाचा दुरूपयोग थांबवावा आणि या प्रस्तावित बांधकामाची चोकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदनावर खुशाल सपाटे, रोहीत रतन मने, रंजित आ.बनकर, निश्चय इंदुरकर, अरूण मिश्रा आदींच्या सह्या आहेत.