माणूस म्हणून जगण्याचे ज्ञान कमी होणार नाही याचे भान ठेवा- डॅा.बारहाते

'जीवनसाधना'ने डॅा.सालफले सन्मानित

गडचिरोली : कौशल्यावर आधारित शिक्षणप्रणाली स्वीकारत असताना माणूस म्हणून जगण्याच्या मौलिक ज्ञानाचे महत्त्व कमी होणार नाही, याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या 13 व्या वर्धापन दिन सोहळ्यात डॉ.बारहाते यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. या सोहळ्याला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, अधिष्ठाता डॉ.श्याम खंडारे, अधिष्ठाता डॉ.संजीव निंबाळकर, डॉ.जयेश चक्रवर्ती, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सीए भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते.

या सोहळ्यात चंद्रपूर येथील वनवासी कल्याण आश्रमचे डॉ.शरद सालफले यांना यावर्षीचा जीवनसाधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाने 13 वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा मांडला.

डॉ.मिलिंद बारहाते पुढे म्हणाले, 1991 नंतर जागतिकीकरणाचा अवलंब केल्यावर सर्वच क्षेत्रात निर्माण झालेली स्पर्धा शिक्षण क्षेत्रात मात्र टोकदार झाली आहे. मर्यादित संसाधने आणि अपुरे मनुष्यबळ असतानाही महाविद्यालये आणि विद्यापीठांनी आज यशस्वीपणे नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले आहे. नवीन शैक्षणिक धोरण आखल्यावर त्यानुसार होणारे बदल आणि स्थित्यंतरे याचे भान महाविद्यालये आणि विद्यापीठांनी ठेवून सजग असणे गरजेचे आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ.शरद सालफले म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून वनवासी कल्याण आश्रमचे काम करीत आहे. दुर्गम भागात आदिवासींसाठी सर्जिकल कॅम्प घेऊन आदिवासींची सेवा केली. मात्र आज ज्या आदिवासी भागात गोंडवाना विद्यापीठ आहे त्या भागात मला पुरस्कृत केले, याबद्दल मी विद्यापीठाचा आभारी आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डॉ.शरद सालफले यांच्या मानपत्राचे वाचन प्रा.डॉ.सविता गोविंदवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.नरेंद्र आरेकर आणि डॉ.अपर्णा भाके यांनी केले. याप्रसंगी माजी कुलगुरु, प्रशासकीय अधिकारी, माजी प्र-कुलगुरु, अधिसभा सदस्य, दानदाते, विशेष आमंत्रित, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.