नवीन वसाहतींसह सर्व गडचिरोलीकरांना मिळणार 24 तास नळाचे शुद्ध पाणी

131 कोटींच्या विस्तारित योजनेला मंजुरी

गडचिरोली : गडचिरोली शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन 131 कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे शहरातील नवीन लोकवस्त्यांसह सर्वांना 24 तास पाणी पुरवठा होईल, असे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी सांगितले.

गडचिरोली शहराची विद्यमान पाणी पुरवठा योजना सन 2000 पूर्वीची आहे. परंतू त्यानंतर तयार झालेल्या नवीन वसाहतींसाठी ही पाणी पुरवठा योजना अपुरी पडत होती. मानकानुसार दररोज प्रतिमानसी 135 लिटर पाण्याची गरज असते. ती वाढती लोकसंख्या पाहता सध्याची पाणी पुरवठा योजना अपुरी पडत आहे. अनेक भागात अपुरा पाणी पुरवठा किंवा काही नवीन वसाहतींमध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईनच नसणे अशा समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे 2045 ची लोकसंख्या लक्षात घेऊन नगर परिषदेने विस्तारित पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाच्या नगर विकास मंत्रालयाकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. लवकरच त्याबाबतचा शासन आदेश जारी करून निधीची तरतूद केली जाईल, असे मुख्याधिकारी पिदुरकर यांनी सांगितले. या विस्तारित पाणी पुरवठा योजनेसाठी कोटगल बॅरेजमधून पाणीसुद्धा आरक्षित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे या विस्तारित पाणी पुरवठा योजनेसोबत एक्स्प्रेस फिडरचे नियोजन केले आहे. नवीन टाक्यांसह नवीन पाईपलाईनही टाकली जाणार आहे. त्यामुळे गडचिरोलीकरांना 24 तास नळाचे शुद्ध पाणी मिळेल, असेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत ही योजना कार्यान्वित होणार आहे.