निवडणुका बघून नाही तर अस्सलपणे कामे करणाऱ्यांच्या पाठीशी रहा- आत्राम

कापेवार-बेलदार समाजभवनाचे लोकार्पण

अहेरी : निवडणुका येतात-जातात, पण पायाभूत कामे हेच तारत असतात. त्यामुळे मतांच्या लालसेपोटी निवडणुका आल्या की कामाला लागणाऱ्यांपैकी मी नाही. त्यामुळे नेहमी तुमच्यासोबत असणाऱ्या, अस्सल कामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. रविवार 6 ऑक्टोबर रोजी अहेरीलगतच्या गडअहेरी येथे कापेवार समाज भवनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते किष्टय्या उपलपवार, तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी आर.के. पारेल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, सतीश तोटावार, आनंद रालबंडीवार, राजेश्वर रंगुलवार आदी उपस्थित होते.

यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, बेलदार-कापेवार समाज भवनाचे काम पूर्णत्वास आले असून समाज भवनामुळे समाजाच्या सर्वांगिन विकासाला चालना मिळते. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या समाजासाठी असंख्य समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून समाज भवन उभारले. आजचा लोकार्पण सोहळा ऐन निवडणुकीच्या हंगामात आला असला तरी, निवडणुकीवर डोळा ठेऊन मी मते मुळीच मागणार नाही. पण कामे करणाऱ्यांच्या पाठीशी जनताजनार्दन भक्कमपणे उभे राहते, असा मला विश्वास आहे.

अध्यक्षीय भाषणात समाजाचे ज्येष्ठ नेते किष्टय्या उपलपवार यांनी आपल्या भागात एक मोठी वास्तू बनली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना जाते. त्यामुळे कापेवार-बेलदार व अन्य तत्सम समाजाने एकजुटीने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, प्रशांत नामनवार यांनी भव्य समाज भवनाच्या बांधकामाविषयी आणि समाजसुधारक मा.सा.कन्नमवार यांच्या कार्याचा उहापोह करून धर्मरावबाबा आत्राम यांच्यामुळे समाज भवनाचे काम शक्य झाल्याचे सांगत समाज एकजुटीने धर्मरावबाबा यांच्या पाठीशी भक्कमणे राहणार असल्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका गडपल्लीवार यांनी तर संचालन प्राजक्ता पेदापल्लीवार यांनी केले. उपस्थितांचे आभार शालिनी मुक्कावार यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.