गडचिरोली : अनुसूचित जमाती प्रवर्गात मिळणाऱ्या आदिवासींच्या आरक्षणावर डोळा ठेवणाऱ्या धनगर आणि इतर काही जातींना हे आरक्षण देण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी आदिवासी समाजाच्या वतीने रविवारी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आदिवासी समाजबांधवांसोबत सर्वच पक्षांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन आदिसासींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ‘हम साथ-साथ है’ चा संदेश दिला.
आरक्षण बचाव कृती समितीच्या नेतृत्वात काढलेल्या या महामोर्चात ‘बोगस हटाव’असे प्रिंट केलेल्या पिवळ्या टोप्या घालत हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेकांनी मार्गदर्शन करत आदिवासींच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.
या मोर्चात खासदार डॅा.एन.डी.किरसान, आ.डॅा.देवराव होळी, माजी आ.डॅा.नामदेव किरसान, अॅड.विश्वजित कोवासे, हनुमंतू मडावी, मनोहर पोरेटी, घनश्याम मडावी, गुलाबराव मडावी, अमरसिंग गेडाम, अमोल कुळमेथे, वर्षा शेडमाके, फरेंद्र कुतीरकर, डॅा.सचिन मडावी, विनोद मडावी, जयश्री वेळदा आदींसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, सतीश विधाते असे अनेक राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी खा.किरसान यांनी आदिवासींचे प्रश्न संसदेच्या पुढील अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. तर आ.डॅा.होळी यांनी भाषणाला सुरूवात केल्यानंतर उपस्थितांमध्ये थोडा गोंधळ सुरू झाला. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून ते आदिवासींचे प्रश्न सरकारपुढे मांडत नसल्याचा ठपका ठेवत काही लोकांनी नारेबाजी केली. पण डॅा.होळी यांनी या मुद्द्यावर मी तुमच्यासोबत असून प्रसंगी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी असल्याचे सांगितले.