प्रियकरासोबत आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या वडीलानेही घेतला गळफास

बापलेकीच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा

मुलचेरा : तालुक्यातील लक्ष्मीपूर गावालगतच्या शेतातील झोपडीत एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा मानसिक धक्का बसून मुलीच्या वडीलानेही जंगलातील एका झाडावर गळफास घेतला. अमित अनिल रॉय (40 वर्ष, रा.विजयनगर) असे मृत वडीलाचे नाव आहे.

जयदेब मिलन मंडल (रा. लक्ष्मीपूर) आणि अमेला अमित रॉय (रा.विजयनगर) या प्रेमीयुगलाचे प्रेमप्रकरण घरातील लोकांना कळले होते. त्यांनी त्याला विरोध केला होता. घरातील लोक आपले लग्न होऊ देणार नाही याची कल्पना आल्याने त्यांनी साथ जिएंगे-साथ मरेंगे म्हणत आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यातूनच लक्ष्मीपूर येथील त्या युवकाच्या शेताशेजारील दुसऱ्या एका शेतातल्या झोपडीत दोघांनीही सोबत गळफास घेतल्याचे रविवारी उघडकीस आले होते.

मुलचेरा पोलीस घटनास्थळी पंचनामा करत असताना तिथे मोठी गर्दी जमली होती. त्या गर्दीत मुलीचे वडील अमित रॉय हेसुद्धा होते. मुलीने उचललेले हे टोकाचे पाऊल पाहून त्यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यामुळे ते तेथून तडक निघून गेले. पोलिसांच्या पंचनाम्यानंतर शवविच्छेदनाची तयारी सुरू असताना मुलीचे वडील दिसत नसल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. पोलिसांनाही ही बाब कळल्यानंतर त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. पोलिसांनी अमित रॅाय यांचा मोबाईल नंबर ट्रॅकिंगवर टाकला. त्यांचे लोकेशन ट्रॅक होताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. रात्री ८ वाजता विजयनगर गावालगतच्या जंगलात अमित रॉय हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

मुलीचे प्रियकरासोबत आत्महत्या करण्याच्या घटनेने बसलेला मानसिक धक्का सहन न झाल्याने अमित रॉय यांनी स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आत्महत्येचा विचार पक्का करत दोर घेऊन दुचाकीने जंगल गाठले. एका झाडाखाली दुचाकीवर उभे होऊन फांदीला गळफास बांधला. त्यानंतर दुचाकीवरून बाजुला होऊन स्वत:ला गळफास लावून घेतला.

पिता-पुत्रीच्या या आत्महत्येने विजयनगर आणि परिसरात चांगलीच खळबळ माजली असून रॅाय कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलचेरा पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.