मुलचेरा : महायुतीच्या माध्यमातून राज्यभरात विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्या योजनांचा गोरगरीब नागरिकांना मोठा फायदा होत आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळे या योजनेचा विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप करत राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुलचेरा तालुका मुख्यालयी घेण्यात आलेल्या जनसंवाद यात्रा व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी पं.स.सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष रियाज शेख, अहेरीचे माजी सरपंच तथा युवा नेते रामेश्वरबाबा आत्राम, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, सुंदरनगरच्या सरपंच जया मंडल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, मुलचेरा पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा येमुलवार, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, मुलचेराचे नगराध्यक्ष विकास नैताम, उपाध्यक्ष मधुकर वेलादी, राकॉचे अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, विष्णू रॉय, नगर पंचायतीचे माजी अध्यक्ष सुभाष आत्राम, जेष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार, कोठारीचे उपसरपंच मनोज बंडावार, ग्रा.पं.सदस्य निखिल इज्जतदार, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुलचेरा तालुका अध्यक्ष ममता बिश्वास, सेवानिवृत्त शिक्षक रतन दुर्गे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, निवडणुका आल्या म्हणून बरेच लोक प्रचारासाठी घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. काही लोक लाडकी बहिण योजना फसवी असल्याचे सांगत आहेत, तर काही लोकं ही योजना आम्हीच आणली म्हणूनही प्रचार करत आहेत. मात्र महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हे महिलांना कळले आहे. त्यामुळे विरोधक कितीही अपप्रचार किंव्हा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असले तरी यंदाच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा टोला त्यांनी लगावला.
मुलचेरा तालुक्याच्या निर्मितीचा लाभ
या भागाचा विकास मार्गी लावण्यासाठी मुलचेराला तालुक्याचा दर्जा मिळायला पाहिजे म्हणून मी 1992 मध्ये मंत्री असताना चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून मुलचेरा तालुक्याची निर्मिती केली. त्यामुळे आज या तालुक्यातील 68 गावांतील नागरिकांना मुलचेरातच विविध शासकीय कार्यालये उपलब्ध झाली. तालुक्याच्या विकासासाठी पाहिजे तो निधी खेचुन आणला. येथील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून तर महाविद्यालयीन शिक्षणाची सोय केली. आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केल्या, येथील शेतकरी उत्तम शेती देखील करीत आहेत. तालुका निर्मिती झाल्याने विविध शासकीय कार्यालये आली आणि अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. यापुढे देखील तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असून आपल्याला खंबीरपणे साथ देण्याचे आवाहन धर्मरावबाबा यांनी केले.
नागरिकांना मिळाला शासकीय योजनांचा लाभ
जनसंवाद यात्रेदरम्यान मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन निवेदन स्वीकारले. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी विविध विभागांकडून लाभार्थ्यांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी तहसीलदार चेतन पाटील, गटविकास अधिकारी एल.बी.जुवारे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.