गडचिरोली : गडचिरोली वनवृत्तांतर्गत जिल्ह्यातील पाचही विभागांमध्ये वनरक्षकांच्या पदभरतीसाठी गेल्यावर्षी जाहीरात काढूनही अनुसूचित क्षेत्रात (पेसाअंतर्गत क्षेत्र) नियुक्ती रखडलेल्या जागा आता तातडीने मानधन तत्वावर भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्यावर्षीच्या पदभरतीमध्ये पात्र झालेल्या 150 उमेदवारांना गुणानुक्रमे नियुक्ती देण्यासाठी मुख्य वनसंरक्षक एस.रमेश कुमार यांनी पात्र उमेदवारांची यादी जारी केली. त्यांना दिलेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्यास सांगितले आहे. जे उमेदवार तातडीने रुजू होणार नाहीत त्यांच्या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
पेसा क्षेत्रातील रिक्त पदांवरील रखडलेली पदभरती तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात तीन दिवसांपूर्वी जी.आर. काढला होता. त्यात न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून रिक्त असलेल्या जागा तात्पुरत्या मानधनतत्वावर भरण्याचा आदेश देण्यात आला. पुढील आठवडाभरात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सदर नियुक्त्या तातडीने करण्याची सूचना शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय (तलाठी भरती) यांच्यापाठोपाठ वनविभागाने नियुक्त्या देण्यात नंबर लावला आहे. नियुक्ती दिलेल्या 150 उमेदवारांची यादी वनविभागाने आपल्या वेबसाईटवर टाकली आहे.
गडचिरोली, वडसा, आलापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाच वनविभागासह बल्लारपूर राखीव क्षेत्रातही नवीन वनरक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे.