ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत करा, यश नक्की मिळेल- खा.किरसान

आयएएस अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींना सल्ला

गडचिरोली : सक्षम आयएएस अकॅडमीमार्फत मिळणारे प्रशिक्षण मोफत आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका, नियमित अभ्यास करा आणि तुम्ही जे ध्येय निश्चित केले आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत करा, यश नक्की मिळेल, असे मार्गदर्शन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केले.

ट्रिटी, बार्टी, सारथी व महाज्योती या संस्थांच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या सक्षम आयएएस अकॅडमी, चामोर्शी रोड गडचिरोली शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर, सक्षम अकॅडमीचे संचालक अतुल सोनवणे, दर्शन तलहांडे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोविंदराव बानबले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, जिल्हा संघटक अरुण झाडे, चंद्रकांत शिवणकर, प्रभाकर भागडकर, अधिकारी-कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास मस्के आदी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.येलेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. नुकत्याच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या शासकीय वसतिगृहे व सावित्रीबाई आधार योजनेची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण व कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

यावेळी गोविंदराव बानबले व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण झाडे यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक अतुल सोनवणे, तर संचालन प्रा.दिनेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्यापक उपस्थित होते.