सोन्याचा चमचा तोंडात असणाऱ्यांना आमच्या घरातील दु:ख कळणार का?

कामगार वर्गात पसरतोय असंतोष

एटापल्ली : गेल्या 40 वर्षांपासून नक्षलवादाने पीडित असणाऱ्या कुटुंबांना रोजगार मिळत नव्हता. जंगलातल्या मर्यादित आणि हंगामी वनौपजातून मिळणाऱ्या तोकड्या उत्पन्नात दोन जणांचा संसारही करता येत नव्हता. आता लोहखाणीतून कसा का असेना, रोजगार तरी मिळत आहे. किमान आम्हाला आणि आमच्या कुटुंबातील सदस्यांना पोटभर खायला मिळत आहे. पण हे काम बंद पाडण्याची भाषा जर कोणता उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते करत असेल तर त्या उमेदवाराला आम्ही निवडणुकीत धडा शिकवू, अशी तीव्र भावना एटापल्ली आणि अहेरी तालुक्यातील कामगार वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

सध्या व्हॅाटस् अॅपवरच्या काही ग्रुपवर निवडणुकीच्या चर्चा जोरात रंगत आहेत. त्यात अहेरी मतदार संघ सर्वात पुढे आहे. ग्रुपवरच्या प्रतिक्रियांची चर्चा नंतर प्रत्यक्षात होणाऱ्या गप्पांमध्ये रंगते. अशातच अहेरीचे माजी आमदार आणि माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कार्यकर्त्यांकडून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना लक्ष्य करण्यासाठी सुरजागड प्रकल्पावर टिका केली जात आहे. एका अपघातानंतर राजेंनी सुरजागडचे काम बंद पाडले होते, ते पुन्हा तसे करू शकतात असेही कार्यकर्ते म्हणतात. त्यामुळे एटापल्ली, अहेरी तालुक्यातील कामगार कुटुंबांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

राजघराण्याची परंपरा असलेल्या अहेरी मतदार संघात यावेळीही राजे अम्ब्रिशराव आत्राम आणि त्यांचे काका असलेले मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यात यावेळीही लढत होण्याची दाट शक्यता आहे. अम्ब्रिशराव यांच्याआधी त्यांचे वडील सत्यवानराव हे गादीचे वारस होते. त्यामुळे लहानपणापासून अम्ब्रिशराव हे श्रीमंतीत वाढले. आता त्यांचेच काही कार्यकर्ते सुरजागड खाणीला बंद पाडण्याची भाषा करत आहेत. त्यात अम्ब्रिशराव हे सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळत नकारात्मक भूमिका घेत असल्याने खाणीत रोजगार मिळालेल्या कुटुंबांमध्ये असंतोष पसरला आहे. सोन्याचा चमचा तोंडात असणाऱ्यांना आमच्या घरातील दु:ख कळणार का? असा सवाल युवक करत आहेत. रोजगाराच्या विरोधात जे कोणी भूमिका घेतील त्यांच्याविरोधात आमची भूमिका राहिल, असे युवा वर्गाकडून ठणकावून सांगितले जात आहे. त्यामुळे हा मुद्दा एटापल्ली, अहेरी तालुक्यातील गोरगरीब कामगार वर्गासाठी संवेदनशिल झाल्याचे दिसून येते.