आशियाई गोल्फ स्पर्धेत कांस्यपदक मिळवून देणाऱ्या ईशाचा सत्कार

मानवाधिकार संघटनेकडून कौतुक

गडचिरोली : मुलींच्या भारतीय संघात स्थान मिळवून चांगमाई (थायलंड) येथील आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्यात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या ईशा दिगंबर फुलबांधे हिचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने तिच्या घरी जाऊन सत्कार केला.

घरच्या जेमतेम परिस्थितीतून ईशाने मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. तिच्या या यशाने इतरांनाही प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी व्यक्त केली. यावेळी तिचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ईशाचे वडील दिगांबर फुलबांधे व आई यांचेही कौतुक करण्यात आले.

येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातून ईशाने अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून ईशाला खेळामध्ये रुची होती. त्यामुळे आईवडीलांनी परिस्थितीचा बाऊ न करता तिला नागपूर येथे मिनी गोल्फ प्रशिक्षणासाठी पाठवले होते.

यापूर्वी ईशाचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने गोवा येथे पार पडलेल्या मिनी गोल्फ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता. ईशा ही सध्या हेडरी येथील लॉयडस् मेटलद्वारा संचालित शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. ईशाच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतिक होत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक डॉ.रेवतीकर व आई-वडिलांना दिले.

तिच्या सत्कारप्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, लक्ष्मी कन्नाके, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अखिल तायडे व कार्यकर्ते उपस्थित होते.