गडचिरोली : गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या उमेदवारीवर गडचिरोली विधानसभेचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या डॅा.देवराव होळी यांना तिसऱ्यांदा या मतदार संघात निवडणूक लढायची आहे. पण पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. महायुतीमधील घटक पक्षांना पुढे करत आम्हाला उमेदवार म्हणून डॅा.होळीच हवेत, असा सूर आवळण्यात आला. एवढेच नाही तर येत्या 25 ऑक्टोबरला गडचिरोलीत मित्र परिवार आणि समर्थकांचा मेळावा घेतला जाणार आहे. तोपर्यंत तिकिटाबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास या मेळाव्यातून ते स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
दि.22 ला प्रेस क्लब हॅालमध्ये महायुतीमधील शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन निवडून येण्याची क्षमता डॅा.होळी यांच्याकडेच असल्याने आम्ही त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे पत्रकारांपुढे सांगितले. भाजपने जाहीर केलेल्या 99 लोकांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नसले तरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत त्यांचे नाव नक्की असेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. मात्र तिकिटबाबत नसलेली शाश्वती पाहून अनेक जण अस्वस्थ झाल्याचेही दिसत होते.
प्राप्त माहितीनुसार, डॅा.होळी यांना मुंबईत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अंतिम प्रयत्न म्हणून ते दिल्ली दरबारी गेल्याची चर्चा आहे. आता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्या दबावतंत्रापुढे झुकतात, की त्यांची मनसमजावणी करत त्यांना पक्षाचे काम करण्याचा सल्ला देत परत पाठवतात याकडे गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नामदेव दुधबळे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा संघटक संजय शिंगाडे, तालुकाध्यक्ष विवेक बामनवाडे, किशोर बावणे, दिलीप चव्हाण, साईनाथ बुरांडे, मधुकर भांडेकर, शिवसेनेच्या निता वडेट्टीवार, रिषा डोईजड, विलास दशमुखे, मुक्तेश्वर काटवे असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.