15 केंद्रांवर ‘इन कॅमेरा’ होणार 10 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा

5614 उमेदवारांनी केली नोंदणी

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 15 केंद्रांवर दोन सत्रांमध्ये होणार आहे. एकूण 5614 उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ही परीक्षा सुरळीत होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी संजय देने यांच्या अध्यक्षतेखाली 24 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय आयोजन व सनियंत्रण सभेचे आयोजन केले होते.

या सभेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बळीराम चौरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेच पवार, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) विवेक नाकाडे, पोलीस निरीक्षक फटींग तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात आयोजित केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-1 करीता 2343 विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यांची परीक्षेची वेळ रविवार सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. पेपर 2 करीता 3271 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांची परीक्षेची वेळ दुपारी 2.30 ते 5 वाजेपर्यंत आहे.

ही परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत प्रत्येक परीक्षा दालनात, केंद्राच्या प्रवेशद्वारावर, केंद्र नियंत्रण कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. उमेदवारांच्या तपासणीकरीता फिंगरप्रिंट व फेस स्कॅनिंग, फ्रिस्किंग आदी सुविधा प्रत्येक केंद्रात देण्यात येणार आहेत. तसेच पुरेशा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त राहणार आहे. परीक्षा केंद्राच्या बाहेर 100 मीटरच्या आत कोणतेही झेरॉक्स मशीन चालू राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय देने तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दिल्या आहेत.