आ.कृष्णा गजबेंच्या नामांकन रॅलीला अभूतपूर्व गर्दीसह उत्सवाचे स्वरूप

लेझिक, दिंडी, देखाव्याने वेधले लक्ष

देसाईगंज : आरमोरी विधानसभा मतदार संघाचे मुख्यालय असलेल्या देसाईगंजमध्ये सोमवारचा दिवस उत्सवासारखा होता. भाजपकडून आ.कृष्णा गजबे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने जमलेली अभूतपूर्व गर्दी चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे एखाद्या उत्सवाच्या रॅलीप्रमाणे यात लेझिम पथकासह गोंडी नृत्य, भजन दिंडी, झाँकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

ढोल-ताशांच्या गजरात ही नामांकन महारॅली आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणावरून निघून शहरातून फिरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचली. तिथे उपविभागीय अधिकारी मानसी यांच्याकडे नामांकन दाखल करण्यात आले. यावेळी सहकार महर्षी अरविंद सावकार पोरड्डीवार, भाजपचे विधानसभा निरीक्षक श्रीनिवास, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरड्डीवार, विधानसभेचे महायुती समन्वयक किशन नागदेवे, पीरिपा (कवाडे गट)चे मुकेश खोब्रागडे, भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अर्चना गोंदोळे, अनु.जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड.उमेश वालदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर तलमले, युनूस शेख, संजय साळवे, ज़िल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नारायण धकाते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणाले, आमदार कृष्णा गजबे यांनी 10 वर्षात या विधानसभा क्षेत्रात अनेक विकासात्मक कामे केली आहेत. पुन्हा राहिलेली कामे करण्यासाठी मृदू व शांत स्वभावाच्या कृष्णा गजबे यांना निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार कृष्णा गजबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, आपल्या आशीर्वादाने विधानसभा क्षेत्रात राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

अशोक नेते यांनी दिल्या शुभेच्छा

आरमोरी विधानसभा क्षेत्रासाठी आ.कृष्णा गजबे यांचा नामांकन अर्ज दाखल झाल्यावर माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच विधानसभा निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक अशोक नेते यांनी देसाईगंज (वडसा) येथे भेट देऊन भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार कृष्णा गजबे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, अनु.जाती (दलित) मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड.उमेश वालदे प्रामुख्याने उपस्थित होते.