गडचिरोली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून विविध प्रकारची तयारी सुरू आहे. मात्र यात ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली त्यांनी यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाला हजर राहणे बंधनकारक असताना काही कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील अशा 108 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी
त्यांना नोटीस बजावण्यात आली. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
26 व 27 ऑक्टोबर रोजी मतदान अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणासाठी गडचिरोली, धानोरा व चामोर्शी तालुक्यातील 1 हजार 819 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परंतु वेगवेगळी कारणे दाखवून नियुक्ती रद्द करण्यासाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे.
प्रशिक्षणात अनधिकृतपणे 108 कर्मचारी गैरहजर राहिले. गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून तात्काळ खुलासा मागितलेला आहे. प्राप्त झालेला खुलासा उचित व समाधानकारक न वाटल्यास त्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी दिली.