आरमोरी : आरमोरीचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचे काल दि.2 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास नागपूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. हृदय शस्रक्रियेनंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूरला उपचारासाठी नेले होते. तिथेच त्यांचे निधन झाले. जिल्ह्यातील शिवसेनेचे ते पहिले आमदार होते.

सुरवातीला शिक्षकी व्यवसायात असताना त्यांनी झाडीपट्टी रंगभूमीही गाजवली. वरखडे गुरूजी म्हणून ते सर्वत्र लोकप्रिय होते. त्यामुळे 1990 मध्ये शिवसेनेने त्यांना आरमोरी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. त्यावेळी ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.
कुरखेडा, कोरचीसह आरमोरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागात त्यांनी गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली होती. मात्र पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविले होते. यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वरखडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नात व बराच मोठा आप्त परिवार आहे.

































