प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी भाजपमधील अंतर्गत विरोधक एकत्र

तनं जुळली, पण मनं जुळणार का?

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदार संघात भाजपची उमेदवारी कोणाला द्यावी या मुद्द्यावरून उठलेले पेल्यातील वादळ शांत करण्यात भाजपला यश आले आणि संभाव्य बंड थंड झाल्याचे वरकरणी दिसत आहे. पण ज्यांनी डॅा.मिलिंद नरोटे यांच्या उमेदवारीला जाहीरपणे विरोध केला होता तेच त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला आले. यानिमित्ताने ‘हम साथ-साथ है’ असा संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र पक्षांतर्गत विरोधकांची तनं जुळली असली तरी, मनं जुळणार का? असा सवाल अनेकांच्या मनात उठत आहे.

या मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.देवराव होळी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी आमदार तथा भाजप नेते डॉ.नामदेव उसेंडी, शिवसेनेचे नेते हेमंत जब्बेवार, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, डॉ.चंदा कोडवते, शिवसेनेचे नेते राजू कावळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शिवसेनेच्या नेत्या नीता वडेट्टीवार, अविनाश वरघंटे, दीपक बारसागडे यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी अशोक नेते यांनी या कार्यालयाच्या उद्घाटनाने निवडणूक प्रचारात नवा उत्साह निर्माण झाला आहे. महायुतीच्या विजयी मोहिमेची ही सुरुवात आहे, असे सांगून महिला, शेतकरी आणि युवकांच्या कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. यावेळी विरोधकांच्या योजनांविरोधातील भूमिकेवरही त्यांनी टीका केली. यावेळी इतर प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करत डॉ.नरोटे यांना विजयी करण्याचा संकल्प केला.