जिल्हाभरातील 309 गावांनी घेतला दारूमुक्त निवडणुकीचा ठराव

मुक्तीपथ, शक्तीपथ संघटनेचा पुढाकार

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत दारू घेऊन मतदान करणार नाही, दारूचे वाटप करणाऱ्या आणि दारूबंदीला विरोध करणाऱ्या उमेदवारांना मतदान करणार नाही, असा ठराव 309 गावांनी केल्याचा दावा मुक्तिपथ संघटनेने केला आहे.

मुक्तिपथ व शक्तिपथ गाव संघटनेच्या नेतृत्वात दारूमुक्त निवडणुकीसाठी जनजागृती करण्यात आली. निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे प्रलोभन देऊन मत मागणाऱ्या उमेदवारांमुळे विकासाला खिळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदानाच्या काळात दारू नसेल तर भांडणे शक्यतो होत नाही, शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडते. विकासासाठी निवडून दिलेल्या उमेदवाराला जाब विचारता येतो. त्यामुळे उमेदवारांकडून दारूचे वाटप होऊ नये यासाठी मुक्तिपथ-शक्तीपथ गाव संघटनेच्या माध्यमातून गावागावांमध्ये ठराव घेऊन आपला उमेदवार कसा असावा, मतदारांचे कर्तव्य आदी बाबी पटवून दिल्या जात आहेत.

निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचे समर्थन करणारा असावा. आमचे मत हवे असल्यास दारूबंदी समर्थनाचे लिखित वचन निवडणुकीत उभे असणार्‍या उमेदवाराने आम्हाला द्यावे. वचन न देणार्‍या नेत्याला, उमेदवाराला आम्ही मत देणार नाही. जो दारू वाटप करेल त्याला आम्ही मत देणार नाही असे मुद्दे ठरावात घेण्यात आले.