कर्त्यव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला सुरुवात

पहिल्याच दिवशी 1222 जणांचा पुढाकार

गडचिरोली : आपल्या घरापासून आणि गावापासून लांब, कर्तव्यावर असलेल्या पोलीस दलातील जवान आणि अधिकाऱ्यांच्या टपाली मतदानाला सोमवारपासून सुरूवात झाली. दि.11 ते 13 नोव्हेंबर असे तीन दिवस ही टपाली मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी गडचिरोली, देसाईगंज आणि अहेरी असे तीन केंद्र देण्यात आले आहेत. काल पहिल्याच दिवशी 1222 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले.

जिल्ह्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी या विधानसभा मतदार संघात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक काळात पोलीस दल हे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व यशस्वीपणे पार पाडण्याकरिता कर्त्यव्यावर तैनात राहणार असल्याने त्यांना स्वत:चे मतदान करता येत नाही. ही बाब लक्षात घेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करुन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांकरिता 11 ते 13 नोव्हेंबर 2024 असे तीन दिवस तहसील कार्यालय देसाईगंज, आय.टी.आय. कॉलेज नागेपल्ली (अहेरी) आणि तहसील कार्यालय गडचिरोली येथे टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सोमवार, दि.11 रोजी घेण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या टपाली मतदान प्रक्रियेत गडचिरोलीत 484, देसाईगंज येथे 235, तर नागेपल्ली (अहेरी) येथे 503 अशा एकूण 1222 पोलीस अधिकारी व अंमलदारांनी टपाली मतदान करुन मतदानाचा हक्क बजावला आहे. सदरची टपाली मतदान प्रक्रिया पुढील दोन दिवस सुरु राहणार आहे.

सदर टपाली मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.