गडचिरोली : जिल्ह्यातील येवली-रामपुरी येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त विठ्ठलाच्या पालखीचा सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सहभागी भाविक नदीवर स्नानासाठी ट्रॅक्टरने जात असताना रस्त्यावरील एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन मोठा अपघात घडला. या दुर्घटनेत 22 जण जखमी झाले. अनेकांना हात-पाय फ्रॅक्चर तसेच गंभीर मार लागला.
या घटनेची माहिती मिळताच भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अशोक नेते यांनी तातडीने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. एवढेच नाही तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके व उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंकी, डॉ.मनिष मेश्राम यांना रुग्णांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचाही आढावा घेतला.
यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, भाजप नेते संजय बारापात्रे व नरेश कुंदीकवार उपस्थित होते.