गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये प्रमुख उमेदवारांनी रॅली काढून प्रचाराची सांगता केली. महायुतीच्या वतीने भाजपने गडचिरोली शहरात काढलेल्या रॅलीत उमेदवारासोबत सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर सुद्धा सहभागी झाल्या होत्या. खुल्या वाहनावर उभे राहून नागरिकांना अभिवादन करत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची रॅली शहरातील प्रमुख मार्गाने फिरली. दुपारी 3 वाजता प्रचाराची सांगता करण्यात आली.
महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित रॅलीत काँग्रेसचे उमेदवार मनोहर पोरेटी यांच्यासह गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, अॅड.राम मेश्राम, प्रा.राजू कात्रटवार, शिवसेनेचे अरविंद कात्रटवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, प्रभाकर वासेकर आदी अनेक पदाधिकारी वाहनावर विराजमान झाले होते.
अभिनेत्री सई ताम्हणकरने वेधले लक्ष
डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचारासाठी सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर गडचिरोलीत आल्या होत्या. त्यांनी रोड-शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. सुरूवातीला चामोर्शी आणि नंतर गडचिरोली शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, शिवसेनेचे हेमंत जंबेवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, चामोर्शीत नगरसेविका रोशनी वरघंटे, तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर आदी सहभागी झाले होते.
डॉ.नरोटे यांच्या प्रचारार्थ अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या रोड-शो ची सुरुवात चामोर्शी शहरातील भाजप प्रचार कार्यालयापासून करून लक्ष्मी गेट, वरवंटी चौक मार्गे ही रॅली चामोर्शीत फिरली. त्यानंतर गडचिरोली शहरातील भाजपा प्रचार कार्यालयातून सुरुवात करुन शहरातील गांधी चौक, चंद्रपूर रोड, तेली मोहल्ला, राम मंदिर, आरमोरी रोड, धानोरा रोड मार्गे फिरली. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.