कुरखेडा : तालुक्यातील मौजा कढोली येथे मोठ्या उत्साहाने बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जल, जंगल, जमीन हा आदिवासींचा अधिकार आहे. स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी शुरविरांचे योगदान मोठे आहे. आदिवासी समाजामध्ये एकोपा व ऐक्य निर्माण व्हावे, समाजबांधवांनी एकत्र येऊन आपले हक्क व अधिकार टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा महोत्सवांचे आयोजन हे समाजासाठी प्रेरणादायी ठरते व त्यातून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी नवी दिशा मिळते, असे प्रतिपादन यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अशोक नेते यांनी केले.
यावेळी नेते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून घोषित केला आहे. हा निर्णय आदिवासी समाजासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आज देशाच्या सर्वोच्चपदावर (राष्ट्रपतीपदावर) आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत. हा आदिवासी समाजाचा मोठा गौरव असल्याचे ते म्हणाले.
यावेळी काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, काँग्रेसने 75 वर्षे देशावर राज्य केले, पण आदिवासी समाजाला सन्मानजनक जबाबदारी दिली नाही. उलट आदिवासी समाजाचा केवळ राजकारणासाठी उपयोग केला, असा ठपका त्यांनी ठेवला.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, सामाजिक नेते पिंटु आकरे, सरपंच चंद्रकांत चौके, अजय मडावी,लक्षण टेकाम, माधुरी मडावी, किरण टेकाम, गजानन टेकाम, आदिवासी समाज सेवा समिती कढोलीचे पदाधिकारी, आदिवासी बांधव उपस्थित होते. या महोत्सवात बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा उजाळा देणारे विविध सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमांचे आयोजन यशस्वीपणे शांततेत पार पडले.