गडचिरोली : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्यासह इतर तीन संचालकांचे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय विभागीय सहनिबंधक संजय कदम यांनी रद्द केला आहे. त्यामुळे या संचालकांपुढे नवीन अडचण निर्माण झाली आहे.
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी गण्यारपवार यांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आली होती. अखेर गण्यारपवार यांनी विरोधकांवर मात करत या निवडणुकीत एकतर्फी बहुमत पटकावले. अपेक्षेप्रमाणे सभापतीपदीपदाची माळ पुन्हा एकदा अतुल गण्यारपवार यांच्या गळ्यात पडली. परंतू विरोधकांनी सहकार नियमाचा आधार घेत अतुल गण्यारपवार यांना नामनिर्देशन पत्राच्या वैधतेवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू जिल्हा उपनिबंधकांनी १० मे २०२३ रोजी दिलेल्या निकालात गण्यारपवार यांच्यासह सर्व संचालकांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरवले होते. त्यावर विभागीय सहनिबंधकांकडे अपिल करण्यात आले.
विभागीय सहनिबंधक कदम यांनी २८ जून रोजी दिलेल्या निकालात नामनिर्देशन पत्रात सूचक हा एकापेक्षा जास्त नामनिर्देशन पत्रांवर सूचक म्हणून स्वाक्षरी करू शकत नसल्याचे सांगत सभापती अतुल गण्यारवार, संचालक अभिजित बंडावार, सुधाकर निखाडे, गोसाई सातपुते यांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्याबाबतचा उपनिबंधकांचा निर्णय रद्द केला. तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती (समिती निवडणूक) नियम २०१७ तसेच महाराष्ट्र कृषी बाजार समिती (विकास व विनियम) अधिनियम १९६३ व त्याखालील नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले.