कुरखेडा : जिल्ह्यात सध्या जमावबंदी आदेश लागू असताना गेल्या दि.30 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजता गोठणगाव नाक्याजवळ काही तरुणांनी एकत्र येऊन गोंधळ घालत तलवारीने वाढदिवसाचा केक कापला. एवढेच नाही तर फुशारकी मिरवत या भाईगिरीचा व्हिडीओ सोशल मिडियावर टाकला. याची माहिती मिळाल्यानंतर कुरखेडा पोलिसांनी घटनेची खातरजमा करत गुन्हा दाखल केला आणि चारही तरुणांना ताब्यात घेतले. अखेर त्यांनी या चुकीसाठी कान पकडून जाहीर माफी मागितली.
सार्वजनिक ठिकाणी तलवार बाळगणे शस्रास्र कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असताना तौसिफ रफीक शेख (36 वर्ष), अशफाक गौहर शेख (34 वर्ष), परवेज फिरोज पठाण (25 वर्ष) आणि शाहरूख नसिम पठाण (25 वर्ष) सर्व रा.राणाप्रताप वार्ड, कुरखेडा यांनी उत्साहाच्या भरात भाईचा (तौसिफ शेख) वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करावा म्हणून केक कापण्यासाठी तलवारीचा वापर केला. गोठणगाव नाक्याजवळ हा सर्व प्रकार व्हिडीओत कैद केल्यानंतर तो व्हिडीओ सोशल मिडियावर टाकण्यात आला.
अशा प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी तलवारीसहित सदर तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यात धारदार तलवारही जप्त करण्यात आली. सर्व आरोपींविरुध्द कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा 1959, सहकलम 37 (1) (3), 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ व उपनिरीक्षक वर्षा बोरसे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली. दरम्यान चारही तरुणांनी झालेली चूक कबुल करत माफीही मागितली आहे.