धानोरा : खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत, धानोरा तालुक्यातील रांगी येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत सुरू केलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन शुक्रवार, दि.13 डिसेंबर रोजी झाले. माजी खासदार तथा भाजप अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून व वजन काट्याचे पूजन करून या खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मा.खा.अशोक नेते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून धान खरेदी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांच्या धानाला आधारभूत किंमत मिळावी आणि बाजारपेठेत निर्माण होणाऱ्या अडचणींना आळा घालण्यासाठी अशा केंद्रांची उभारणी महत्त्वाची आहे. या धान खरेदी केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांना योग्य दरात त्यांचे उत्पादन विक्रीसाठी सुलभता मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेते यांनी केले.
यावेळी माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष देविदास दुगा, उपाध्यक्ष दिलदारखान पठाण, संचालक घनश्याम खेवले, देवराव मोंगरकर, वामन गेडाम, उपसरपंच नरेंद्र भुरसे, विपणन निरीक्षक आर.एच. राऊत, सहाय्यक वि.वि.पदा तसेच रांगी या गावातील शेतकरी उपस्थित होते.