आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाकडे नेते, अधिकाऱ्यांची पाठ

10 अतिथींपैकी एकाचीही उपस्थिती नाही

क्रीडा ज्योत पेटवून संमेलनाचे उद्घाटन करताना माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.13) सेमाना बायपास मार्गावरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी एक खासदार, पाच आमदार (विधानसभा-विधान परिषद) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत एकूण 10 अतिथी येणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमुद करण्यात आले होते. पण त्यापैकी एकाही अतिथीने या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. शेवटी माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.

सर्वच्या सर्व अतिथींनी या कार्यक्रमाकडे पाठ का फिरविली? आदिवासी विद्यार्थ्यांबद्दल त्यांना आस्था किंवा कौतुक वाटत नाही का? यायचेच नव्हते तर कार्यक्रम पत्रिकेत नाव कशाला टाकले? असे अनेक गैरसमज वाढविणारे प्रश्न या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांचे पालक आणि इतर उपस्थितांना पडले होते.

वास्तविक खासदार डॅा.नामदेव किरसान संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. आमदारांची मुंबईत लगबग सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकारी आपापल्या कामात व्यस्त असतील. आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीत असतील. असे असताना कोण प्रत्यक्ष कार्यक्रमाला येऊ शकतील याची शहानिशा न करता केवळ ‘फॅार्मलिटी’ म्हणून आणि कार्यक्रम पत्रिकेची शोभा वाढविण्यासाठी सर्वांची नावे अतिथी म्हणून टाकणे कितपत योग्य आहे? यामुळे विनाकारण गैरसमज वाढतात, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी शिक्षकवृंदांमध्ये सुरू होती.

परिस्थितीवर मात करून उन्नती करण्यातच कौशल्य- डॅा.उसेंडी

यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले, आदिवासी खेळाडू क्रीडा व कलागुणांनी निपुण आहेत. खेळातून एकाग्रता निर्माण होते. खेळासोबतच शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय गाठावे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उन्नती करण्यातच खरे कौशल्य आहे. शिक्षकांनी आश्रमशाळेत शिकविण्यासोबतच उज्वल भविष्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अतिथी म्हणून प्रभारी प्रकल्प अधिकारी वहीद शेख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनराज डबले, अनिल सोमनकर, डॉ.प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, सहाय्यक संशोधन अधिकारी गजानन बादलमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्राचार्य परशुराम वांगधरे, अजय आखाडे, भुदेव दास, हेमंत चुधरी, उर्मिला सिडाम, रोशन कुमरे, चंद्रशेखर सिडाम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर उपस्थित होते. यावेळी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील मुलींनी क्रीडा प्रेरणात्मक नृत्य सादर केले.

या क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटमधील 24 शासकीय तर 17 अनुदानित अशा एकूण 41 आश्रमशाळेतील 1 हजार 100 खेळाडूंचा सहभाग आहे. 14, 17 व 19 वर्ष वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळ होत आहेत. सहभागी खेळाडूंना व पंचांना प्रा.अजय जाधव यांनी शपथ दिली.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी तर संचालन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके यांनी केले.