कोंढाळ्यातील क्रीडा संमेलनात सात शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

स्वतःचा, गावाचा लौकिक वाढवा- गजबे

देसाईगंज : कोंढाळा येथे केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक कला संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे व पाहुण्यांचा हस्ते महापुरुषांना प्रतिमेला दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

या क्रीडा संमेलनामुळे विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडाकौशल्य दाखविण्यासाठी स्टेज उपलब्ध होत असतो. असे संमेलन विद्यार्थ्यांचे भविष्य बदलवत असतात. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या केंद्रापुरते न खेळता राज्यस्तरावर आपले नाव, तसेच शाळेचा आणि गावाचा नावलौकिक करावा, असे प्रतिपादन यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना कृष्णा गजबे यांनी केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटक सरपंच अपर्णा राऊत, माजी महिला, बालकल्याण सभापती रोशनी पारधी, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पारधी, उपाध्यक्ष पवन खोब्रागडे, उपसरपंच गजानन सेलोटे, केंद्र प्रमुख आनंदराव गुरनुले, गट समन्वयक एकनाथ पिलारे, ग्रामविकास अधिकारी मेघना राऊत, माजी उपसभापती नितीन राऊत, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार, कोकडीचे सरपंच केवळराम टिकले, पोलीस पाटील किरण कुंभलवार, माजी सरपंच कैलास राणे, तंमुस अध्यक्ष हरिभाऊ पत्रे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नितेश पाटील, रुपेश सहारे, भारती धोटे, वैशाली गुरणुले , भूमिका बोरुले, वैष्णवी वांढरे, सुरेखा बुराडे, कुरूडचे शाळा समिती अध्यक्ष अरुण राऊत आदींसह शिक्षक व गावकरी उपस्थित होते.

मशालज्योत पेटवून झेंड्यांना मानवंदना देत कबड्डी, खो-खो सामन्यांना सुरुवात करण्यात आली. या संमेलनाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोंढाळातर्फे करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील केंद्र कुरुड मधील शिवरजपूर, फरी, उसेगाव, कोकडी, केंद्र शाळा कुरुड, कन्या शाळा कुरुड यांनी क्रीडा संमेलनात सहभाग घेतला. कुरुड केंद्रातील सात शाळेतील 220 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.