
गडचिरोली : सरपण गोळा करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक महिला जंगलात जातात. त्यावेळी वाघाचा हल्ला होऊन त्यांना बळी पडावे लागते. हा मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून गडचिरोली जिल्ह्यातील चुरचुरा हे गाव 100 टक्के गॅस सिलिंडरचे गाव करून ते आता पूर्णपणे धूरमुक्त झाले असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केले. चुरचुरा गावाचा हा आदर्श आता संपूर्ण राज्यभर राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
जंगलावरील अवलंबित्व संपवून मानव-वन्यजीव संघर्ष टाळणार
चुरचुरा येथे आयोजित गॅस सिलिंडर वितरण कार्यक्रमात ॲड.जयस्वाल बोलत होते. “एकही गाव आणि एकही घर असे राहू नये जिथे चूल पेटवण्यासाठी सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागेल, असा आमचा संकल्प आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रामुख्याने लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेल्यावर होणारे वन्यप्राण्यांचे हल्ले आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यजीव संघर्ष कायमचा संपवण्यासाठी ही महत्त्वाची उपाययोजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात चुरचुरा ग्रामपंचायत सभागृहाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
गावाचा सर्वांगीण विकासाचा आराखडा
यापूर्वी चुरचुरा गावातील 92 कुटुंबांकडे गॅस जोडणी होती, मात्र 72 कुटुंबे या सुविधेपासून वंचित होती. आता या सर्व 72 कुटुंबांना दोन सिलिंडरसह गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंत्री जयस्वाल यांनी गावाला ‘उत्पादक’ बनविण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले, जेणेकरून आर्थिक उलाढाल वाढून संपन्नता येईल. ग्रामीण जनतेचा वकील म्हणून आपण विधानसभेत प्रश्न मांडत असल्याचे सांगत त्यांनी विकसित गडचिरोलीसाठी सर्वांच्या सहभागाची गरज व्यक्त केली.
आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांची ग्वाही
आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी यावेळी सांगितले की, गावाला धूरमुक्त करण्यासाठी वनव्यवस्थापन निधीतून 11 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. राज्यमंत्र्यांनी मागील भेटीत दिलेले आश्वासन आज पूर्ण झाले असून, आगामी काळात शासनाच्या इतर निधीतून गावात आर.ओ.चे शुद्ध पाणी, स्ट्रीट लाईट आणि इतर प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यात येतील. यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पीडित कुटुंबांची भेट आणि तत्परता
कार्यक्रमानंतर सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांनी आरमोरी तालुक्यातील इंजेवाडी आणि देऊळगाव येथे भेट देऊन बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुंदाताई मेश्राम आणि मुक्ताबाई नेवारे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
परतीच्या प्रवासात असताना देऊळगाव येथील धनपाल यांनी सहपालकमंत्र्यांच्या ताफ्याला हात दाखविला असता त्यांनी अत्यंत तत्परतेने दखल घेत आपला ताफा थांबवून त्यांच्या कुटुंबातील महिलेवर झालेल्या वाघाच्या जीवघेण्या हल्ल्याची आणि प्रलंबित मदतीची तक्रार ऐकूण घेतली. वनविभागाला त्या कुटुंबाला नियमानुसार तातडीने शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्याच्या सूचना घटनास्थळावरूनच दिल्या.
सहपालकमंत्री यांच्या या दौऱ्यात माजी आमदार कृष्णा गजबे, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सरपंच खोब्रागडे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज म्हशाखेत्री, शिवसेनेचे सुरेंद्रसिंह चंदेल व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
































