– तर 20 हजार ‘लाडक्या बहिणी’ राहतील 3000 रुपयांच्या अनुदानापासून वंचित

काय आहे कारण? जाणून घ्या

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागात सोई-सुविधा नसतानाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 लाख 56 हजार 357 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 53 हजार 502 पात्र अर्जांची राज्यस्तरावरून निधी वितरणासाठी पडताळणी करण्यात आली. यात गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 20 हजार महिलांचे खाते हे आधार क्रमांकाशी संलग्नच नसल्याचे (E-KYC) आढळून आले आहे. त्यामुळे तातडीने त्यांनी आपले बँक खाते आधार लिंक न केल्यास त्यांना 17 ऑगस्टला खात्यात जमा होणाऱ्या दोन महिन्यांच्या (3000 रुपये) अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र महिलांचे खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नाही, त्यांनी तातडीने स्वतःचे मुळ आधार कार्ड, बँक पासबुक, जन्मतारखेचा पुरावा व स्वतःचा किंवा जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल घेवून आपले खाते असलेल्या बँक शाखेत, सीएससी केंद्र, सेतु सुविधा केंद्र, बँक व्यावसायिक मित्र किंवा बँक सुविधा केंद्रात जावून आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, किंवा इ-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले.