गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 500 कोटींचा निधी

प्रलंबित 700 कोटींच्या बिलाचे काय?

गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नुकत्याच झालेल्या गडचिरोली दौऱ्यात यासंदर्भात आढावा घेतला होता. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीची गरज अधोरेखित करत निधी मंजुरीची जोरदार मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता त्या रस्त्यांची पुनर्बांधणी होणार आहे. मात्र नवीन कामे मंजूर करताना झालेल्या कामांची जवळपास 700 कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत, ती कधी देणार? असा सवाल कंत्राटदारांकडून केला जात आहे.

असे आहेत नवीन रस्ते मजबुतीकरण प्रकल्प

1) चंद्रपूर-लोहारा-घंटाचौकी-मुल-हरणघाट- चामोर्शी- घोट- मुलचेरा- अहेरी-व्यंकटापूर- बेजूरपल्ली ते राज्यमार्ग 370 या रस्त्याचे मजबुतीकरण (कि.मी. 34/ 670 ते 49/ 500, ता.चामोर्शी) यासाठी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

2) मुढोली- लक्ष्मणपूर- येणापूर- सुभाषग्राम रस्त्याचे मजबुतीकरण (कि.मी. 0/00 ते 25/00, ता.चामोर्शी) यासाठी 115 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

3) पारवा- केळापूर-वणी- वरुड – नागभीड- ब्रम्हपुरी- वडसा- कुरखेडा- कोरची ते राज्य सीमा (राज्यमार्ग 314) या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी (कि.मी. 132/200 ते 144/400 (ता.कोरची) 94 कोटी 91 लाख रुपये मंजूर करण्यात आले.

या नवीन पुलांचे होणार बांधकाम

1) राज्यमार्ग 380 वर कि.मी. 95/000 ते 114/000 (ता.एटापल्ली) यादरम्यान तीन पुलांचे बांधकाम होणार असून त्यासाठी 27 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

2) राज्यमार्ग 380 वर पूल बांधकामासाठी (कि.मी. 110/200, ता.एटापल्ली) 55 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

3) राज्य महामार्ग 9 ते कमलापूर-दमरंचा- मन्येराजाराम- ताडगाव- कांडोली रस्त्यावर बांढिया नदीवरील पूल व संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी (कि.मी. 3/035, ता.भामरागड) 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

4) MDR-23 वर लंबीया नदीवरील पूल आणि संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी (कि.मी. 5/300) 2 कोटी 59 लाख मंजूर करण्यात आले.

5) झिंगानूर- वादाडेली- येडसिली- कल्लेड- कोजेड- डेचाळी रस्त्यावर येडरंगा वेगू नदीवरील पूल व संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी (कि.मी. 17/050, ता.अहेरी) 2 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले.

विकासाच्या दिशेने मोठे पाऊल

मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या या निधीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पूल प्रकल्पांना गती मिळणार आहे. वाहतूक सोयीस्कर होणार असून नक्षलग्रस्त भागातील विकासालाही चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.