अहेरी : अहेरी नगर पंचायतीअंतर्गत गडअहेरी प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांना मागील 4-5 वर्षांपासून पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने 26 सप्टेंबर 2025 रोजी, जिल्हा उपाध्यक्ष तथा अहेरी विधानसभा प्रमुख नोगेश तोर्रेम यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी गणेश शहाणे यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. 15 दिवसांत अहवाल न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
निवेदनात नमूद केल्यानुसार, गडअहेरी प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांना पिण्याचे पाणी, घरगुती वापरासाठी पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणाऱ्या पाण्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा खंडित असल्याने स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विशेषतः महिलांना आणि मुलांना पाण्यासाठी दूरवर भटकावे लागत आहे. पाण्याअभावी स्वच्छतेच्या समस्याही वाढत असून, आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण झाला आहे.
निवेदन देताना आम आदमी पार्टीचे अहेरी तालुका अध्यक्ष अर्जुन मराठे, अमिता हसते, राजू गोवारादिपे, अनिल डोर्लिकर, वर्षाराणी दुर्गे, सविता ओंदरे, कोता दुर्गे, राहूल दुर्गे, नागु नेताम, लक्ष्मी दब्बा, लक्ष्मी आत्राम, पुष्ण मेश्राम, मंदा सिडाम, वंदना तोरेम, किरण तोरेम, अनुसया इष्टाम, वनिता दुर्गे, संगीता राऊत, लिला मेकला, राजेश्री गेडाम, माऊबाई आत्राम, राजेश करमे, आनंदराव ढब्बा, जोत्सना मराठे, लता कन्नाके, राजअकका आयदोला यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.