कुरखेडा नगर पंचायतची 55 वर्षे जुनी इमारत झाली धोकादायक

तातडीने कार्यवाही करा-'आप'

इमारतीला जागोजागी असे तडे गेले आहेत

कुरखेडा : जिल्ह्यातील कुरखेडा नगरपंचायतीची 55 वर्षे जुनी प्रशासकीय इमारत जीर्णावस्थेकडे वाटचाल करत आहे. ही इमारत धोकादायक अवस्थेत असल्याबाबत आम आदमी पार्टीने (AAP) तातडीच्या संरचनात्मक तपासणीची मागणी केली आहे. जिल्हा कोषाध्यक्ष इरफान पठाण यांच्या नेतृत्वाखालील आपच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी राजकुमार धनबाते यांना निवेदन सादर केले. या इमारतीत भेगा पडणे, स्लॅबचे काँक्रिट गळणे यासारख्या गंभीर समस्या असल्याने कर्मचारी आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनातून सुचित करण्यात आले.

आपच्या निवेदनानुसार, ही इमारत 1970 मध्ये बांधली गेली आहे. केवळ रंगरंगोटी करून ती नगर पंचायत कार्यालयासाठी वापरली जात आहे, ज्यामुळे संरचनात्मक कमकुवतपणा वाढत आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक टाउनशिप अधिनियम, 1965 (कलम 179) आणि UDCPR 2020 (नियम 6.10) अंतर्गत ही इमारत C-1 श्रेणीतील धोकादायक मानली जाऊ शकते. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअर किंवा तांत्रिक समितीमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची, अहवालानुसार दुरुस्ती किंवा पाडकामाची कारवाई करण्याची आणि प्रत्यक्ष वापर मर्यादित करण्याची मागणी केली आहे.

निवेदन देताना आपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू मडावी, सचिव अमृत मेहेर, जिल्हा कामगार आघाडी प्रमुख साईनाथ कोंडावार, संघटक ताहिर शेख, सहसंघटक चेतन गहाणे, सोशल मीडिया प्रमुख अतुल सिंदराम आणि सदस्य अंकुश मडावी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्याधिकारी राजकुमार धनबाते यांनी निवेदनाची दखल घेतली असून, लवकरच तपासणी समिती गठित करण्याचे आश्वासन दिले आहे.