गडचिरोली : जिल्ह्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीने (AAP) सर्किट हाऊस येथे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी आपचे जिल्हा अध्यक्ष नासिर हाशमी, जिल्हा सचिव अमृत मेहेर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाभरातील शाळांना भेटी देऊन आपने केलेल्या पाहणीत शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न, कंत्राटी शिक्षकांना वेळेवर मानधन न मिळणे, शौचालयांची दुरवस्था आणि शाळांच्या जीर्ण इमारतींच्या समस्या समोर आल्या. 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये दोन शिक्षक असताना, 30 पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक आहे. शिक्षकांची बदली प्रक्रिया फेब्रुवारीपासून रखडली असून, भरती प्रक्रिया ठप्प आहे. यामुळे शाळा सुरू होऊन 50 दिवस उलटले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबलेले नाही. कंत्राटी शिक्षकांवर अवलंबून असलेल्या शाळांमध्ये मानधनाची अनियमितता त्यांचे मनोबल खचवत आहे. तसेच, अस्वच्छ शौचालये आणि जीर्ण इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
आपने दिलेल्या निवेदनात, शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, कंत्राटी शिक्षकांना वेळेवर मानधन द्यावे आणि शाळांच्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी केली. शिक्षणमंत्री भुसे यांनी निवेदन स्वीकारताना या समस्यांवर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
नासिर हाशमी यांच्या नेतृत्वात निवेदन देताना जिल्हा संघटक ताहिर शेख, संघटनमंत्री चेतन गहाने आणि उमेश भांडेकर, शहर संघटक साहिल बोदेले, युवा संघटक इरफान पठाण आणि संतोष कोडापे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी शिक्षक उपस्थित होते.