अर्धवट पुलावर टळला अपघात, नाल्यात जाताजाता वाचला ई-रिक्शा

काम सुरू करा, अन्यथा आंदोलन

आरमोरी : जोगीसाखरा ते पळसगाव रस्त्यावरच्या नाल्यावर अर्धवट स्थितीत असलेल्या पुलावर बुधवारी मोठा अपघात होता होता टळला. समोरून आलेल्या वाहनाला बाजु देण्याच्या प्रयत्नात एक ई-रिक्शा नाल्यात कोसळत होता. पण प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान अर्धवट पुलाच्या कामामुळे नागरिकांना होत असलेला त्रास पाहता हे काम लवकर सुरू करून पूर्ण करावे, अन्यथा येत्या 25 मार्चला पुलावरच रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्यासह गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

जोगीसाखरा ते पळसगाव ते डोंगरगाव मार्गावर दोन पुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु पूल रस्त्यापेक्षा 12 ते 13 फूट उंच घेतल्यानंतर जोड रस्त्याचे काम पू्र्ण करण्यात आले नाही. अर्धवट कामामुळे या पुलावरून जाताना वाहतुकीची मोठी कोंडी होते. या अर्धवट कामामुळे देसाईगंजवरुन शंकरपूर मार्गाने येत असलेली एसटी महामंडळाची बस जोगीसाखरा ते पळसगाव नाल्यावरील पुलामुळे बंद झाली. त्यामुळे शाळकरी मुले व नागरीकांना अडचण निर्माण झाली आहे. पुलासोबत नाल्याला साईड वॅाल करणे गरजेचे होते, परंतु ठेकेदाराने ती न केल्याने, तसेच जोड रस्त्यावर मुरुम किंवा गिटी न टाकल्याने बुधवारी सकाळी पळसगाव येथील एक ई-रिक्शा नाल्यात जाताजाता थोडक्यात बचावला.

दरम्यान हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी दिलीप घोडाम, कार्तिक मातेरे, देवनाथ झलके, भेनेश्वर अंबादे, महेश भोयर, दिवाकर जांभुळे, नरेश बरडे, रघुनाथ नखाते, एकनाथ झलके, संदीप सपाटे, गौरीशंकर हजारे, प्रणय सहारे, बळीराम कांबळे, नारायण उरकुडे, रमेश ऊरकुडे, दिनकर मने, कैलास लिंगायत, राहुल घोडाम, देवराव सपाटे, श्रीराम माने, सुमित ढोरे आदी उपस्थित होते.